Tuesday, May 1, 2012

जय महाराष्ट्र

Scene 1 :- मोठा तंबू.आत  फेटेवाले, पोट सुटलेले , जाड मिशीवाले .एक  लहान रंगमंच. लोकांचा धीर सुटतोय. तेवढ्यात ढोलकीचे सूर घुमू लागतात.  एक नाजूक पाठमोरी नार घुंगराचा मधुर आवाज करत , कंबर लचकवत रंगमंचावर येते. ढोलकी थांबते. नार गिरकी घेऊन , भुवया नाचवत लोकांना मुजरा करते. बैठक मांडून पहिला वार करते. " झाल्या तिन्ही सांजा ss....." 
"लई भारी" , "शाब्बास", "तोडलंस", "नाद खुळा"...एकच जल्लोष ..लोकांचे फेटे उडतात. पैश्यांची बरसात....!!!

Scene 2:- विठ्ठल रुखमाईचे देउळ.वारकरी संप्रदाय.अबीर गुलालाचा सुंगंध दरवळतोय. "सर्व स्तरातील" भक्तांचा गोतावळा. मधोमध पांढरा सदरा, तसंच धोतर आणि पागोटे घातलेला सुमार देहबोलीचा पण चेहऱ्यावर अनोखे समाधान असलेला माणूस.एका हातात  चिपळी, दुसऱ्या हातात  तंबोरा. डोळे मिटून नामस्मरण करतो. "पुंडलिक वरदा,हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ..."शंखध्वनी. विठ्ठलाचा जयघोष.अवघी सृष्टी विठ्ठलमय!!! 
"सुंदर ते ध्यान , उभे विटेवरी ss...."

Scene 3:-अति भव्य मैदान.लाखोंचा जनसागर. पक्षाचे झेंडे जागो जागी लागलेले. डोळ्याचे पारणे फिटतील,एवढा मोठा मंच. मागे मोठ्या पडद्यावर शिवाजी महाराजांचे हाती तलवार घेतलेले चित्र. त्यापुढे १५-२० चमचे मंडळी खुर्च्यांवर बसून, घाम पुसत, शक्य तेवढा शांत असण्याचा अभिनय करत. त्यांच्या पुढे  मंचावर मधोमध एक शिडशिडीत देहयष्टीचा पण प्रचंड उर्जा,आत्मविश्वासाने भरलेला 'नेता'.तो ललकारी देतो. 'आजपासून " महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा". एकसुरात "जय भवानी,जय शिवाजी" च्या घोषणा.फटाक्यांची आतषबाजी!!!


आज महाराष्ट्र दिन !! या थोर भूमीत जन्म मिळाला म्हणून अभिमानाने उर भरून येण्याचा दिवस. छत्रपती शिवाजी महाराज ,ज्ञानोबा-तुकोबा, टिळक, सावरकर,फुले, आंबेडकर ह्या नर-रत्नांच्या खाणीत एक धुळीचा कण असल्याच्या समाधानाचा दिवस. आज एक ठरवू या की, काहीतरी मोठे, उदात्त, उन्नत करण्याचा प्रयत्न करणार या आयुष्यात.नाही जमले तर जेवढं जमेल तेवढं प्रेम आणि आनंद लोकांत वाटणार.हो एवढं नक्कीच आहे आपल्या हातात. 
तोपर्यंत "जय हिंद , जय महाराष्ट्र"


ता.क.:- प्रस्तुत blogger सध्या आंध्र प्रदेशात आहे आणि लहान लहान गोष्टींवर senti होत असतो (आणि हा तर मोठा प्रसंग ). आणि आपल्या पुण्या-मुंबईच्या मित्रांवर फार फार जळतो.हि एक संधी जगाला सांगण्याची कि मी  महाराष्ट्राला किती miss करतो  :-p so..its okkkkk...


1 comment: